महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 8 ते 14 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनाचा कालावधी फक्त एक आठवडा ठेवल्याने विरोधकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
या अधिवेशनात राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यांमध्ये होत असलेल्या विविध प्रकारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने त्यांना मदतीचे पॅकेज जाहीर केले असले तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे या अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
मागील काळात अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. विरोधक या मुद्द्यावर अधिवेशनात आक्रमक भूमिका घेऊ शकतात. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.