विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाचा घोळ झाल्याचा आरोप माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी केला आहे. मारकडवाडी गावात अभिरूप बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, प्रशासनाने गावात जमाबंदीचे आदेश लागू केल्यानंतर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काल शरद पवार यांची मारकडवाडीत सभा पार पडली. याच सभेला चोख उत्तर देण्यासाठी आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मारकडवाडी गावच्या दौऱ्यावर येणार आहेत. मंगळवारी सकाळी 10:30 वाजता पडळकर आणि खोत यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती माजी आमदार राम सातपुते यांची माहीती ट्वीट करत दिली. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही गावात येणार आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचे नेते येणार असल्याने दोन्ही गटाची लोक आपले शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.