गेट वे ऑफ इंडियाकडून अरबी समुद्रात एलिफंटाला जाणाऱ्या एका प्रवाशी बोटीला नौदलाची बोट धडकल्यानं ती प्रवाशी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन माहितीसह म्हणाले का, नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून त्यात 13 जणांना मृत्यू झाला आहे. या 13 जणांमध्ये 3 नौदलातील आणि 10 प्रवासी आहेत, 2 गंभीर जखमी झाले असून त्यांना हॅास्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
नेव्ही कोस्टगार्ड आणि पोलिस यांनी 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून बचावकार्य करत तातडीने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही शोध कार्य सुरू आहे. अंतिम माहिती उद्यापर्यंत हातात येईल. वृत्तकांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून दिली जाईल.
या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जाईल, मात्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अशी गोष्ट समोर आली आहे की, मिल्ट्रीच्या नवीन बोटीला नवीन इंजिन होतं त्याचं टेस्टिंग सुरू होतं. त्यात काही बिघाड आल्याने नौदलाची बोट प्रवासी असलेल्या नीलकमल बोटीवर जाऊन आदळली अशी प्राथमिक माहिती आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.