नाशिकच्या शरणपूर रोडवरील "फिजिक्स वाला" क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मनसैनिकांनी क्लासमधील कर्मचाऱ्यांना चोप दिल्या असून, मराठी भाषक विद्यार्थ्यांना "गावठी" आणि "मॅनर्सलेस" म्हणून हिणवल्याचा विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप आहे.
या प्रकारानंतर केवळ ८ दिवसांत क्लास व्यवस्थापनाने सर्व शिक्षकांना मराठी शिकवण्याचे आश्वासन दिले. या घटनेची माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते क्लासवर तुटून पडले. त्यांनी क्लासमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना चोप देत आंदोलन केले आणि मराठी भाषेचा सन्मान राखण्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, क्लासमध्ये मराठी बोलणाऱ्या मुलांना हिणवले जात असून, हिंदी बोलण्यास सक्ती केली जात होती. एका विद्यार्थ्याने सांगितले, "आम्ही मराठी बोललो तर शिक्षक 'गावठी' म्हणून चिडवतात आणि हिंदी बोलण्यास भाग पाडतात. यामुळे आम्हाला अपमानित वाटते." या आंदोलनात मनसैनिकांनी "मराठी माणसाचा सन्मान" आणि "हिंदी सक्ती बंद" अशा घोषणा दिल्या.