केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात आज देशभरात सार्वत्रिक संप पुकारण्यात आला असून, नाशिक जिल्ह्यात संयुक्त कृती समितीच्या वतीने सकाळी दहा वाजता गोल्फ मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध कामगार, कर्मचारी, कंत्राटी आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
चार नवीन श्रम संहितांना विरोध, कंत्राटीकरण थांबवणे, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर हा संप सुरू असल्याची माहिती संघटनांनी दिली आहे. कामगार संघटनांनी चार नव्या श्रम संहिता रद्द करण्याची, कंत्राटी, हंगामी आणि फिक्स टर्म पद्धतीला आळा घालण्याची, समान कामाला समान वेतन लागू करण्याची, किमान वेतन दरमहा ३० हजार रुपयांवर नेण्याची, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन देण्याची, सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण थांबवण्याची, रिक्त पदांवर तात्काळ भरती करण्याची, योजना कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करण्याची, उद्योग बंद पडल्यास कामगारांची देणगी देण्याची आणि महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
या मोर्च्यात शेकडो कामगार सहभागी झाले असून, घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या देशव्यापी संपात ३० कोटीहून अधिक कामगार सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये परिणाम जाणवला.