नाशिक: आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये आजपासून बंदची हाक देण्यात आली आहे. निर्यातीसाठी शेकडो टन कांदा कस्टम ऑफिस बाहेर पडून आहे. निर्यातशुल्काविरोधात बेमुदत संप असल्यामुळे सामान्यांसाठी कांद्याचे वांदे होऊ शकतात.
19 ऑगस्टला सायंकाळी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने कांद्याचे निर्यात शुल्क 40 टक्के केल्याचा अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाला नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आंदोलनंही करण्यात आली आहेत. या निर्णयाचा थेट कांद्याच्या दरवाढीवर परिणाम होणार असून कांदा थेट अर्ध्याने खाली घसरणार असल्याचं कांदा उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे थेट आंदोलनाला सुरूवात झाली आहे.