छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे, अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाला पुण्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाने विरोध केला आहे. "छावा' महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका अखिल भारतीय मराठा महासंघाने घेतली आहे. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप केला जात आहे.
याचपार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार तसेच डॉ. अमोल कोल्हे यांनी छावा चित्रपटाच्या ट्रेलरवरून प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, फक्त ट्रेलर पाहून चित्रपटात नेमकं काय आहे, याचा पूर्ण अंदाज बांधणं कठीण आहे. ट्रेलरमध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई साहेब या लेझीम नृत्य करताना पाहायला मिळत आहे.
हे आपलं पारंपरिक नृत्य आहे आणि या चित्रपटात या नृत्याची पेरणी नेमकी कशा अर्थाने करण्यात आलीये, या मागचा उद्देश नेमका काय? हे चित्रपट पाहिल्या शिवाय लक्षात येणार नाही. छोट्या गोष्टीवरून वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असं मला व्यक्तिगत वाटतं. आपल्या महाराजांचा दैदिप्यमान इतिहास हा हिंदी चित्रपटातून जगासमोर येत असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे.