पुण्यात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीने क्रूरपणे पत्नीची हत्या करत व्हिडिओ काढला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्याच्या खराडी परिसरात बुधवारी पहाटे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पतीने त्याच्या पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून हत्या केली. कूरपणाचा कळस म्हणजे पतीने हत्या केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यांमध्ये पडलेल्या पत्नीचा व्हिडीओ बनवला आणि या व्हिडिओमध्ये हत्या का केली हे सांगितलं आहे. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तो पोलिसांना शरण गेला. पोलिसांना शरण जाऊन त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मयत पत्नीचे नाव ज्योती आहे. आरोपी शिवदास गिते मूळचा बीडचा असल्याची माहिती मिळते. तो न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करतो. गेल्या काही दिवसांपासून नवरा-बायकोमध्ये काही कारणांवरून वाद व्हायचे. ज्योती आणि शिवदास यांच्यामध्ये बुधवारी पहाटे वाद झाले. त्यानंतर पती शिवदासने शिवणकामाच्या कात्रीने पत्नी ज्योतीच्या गळ्यावर वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. पुण्यातील पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. यामध्ये आणखी कोणत्या गोष्टींचा उलगडा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नागरिकांमध्ये शिक्षेची भीती उरली नाही - विद्या चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे. हा अत्यंत भयंकर प्रकार आहे. पुण्यात कोयता गँग आहे, बीडमध्ये लोकं पिस्तुलं घेऊन फिरतात. महाराष्ट्रामध्ये पोलीस दल आहे की नाही. गृहखातं काही करतंय की नाही अशी शंका यायला लागली आहे. पोलीस फक्त व्हिआयपी आणि मंत्र्यांच्या मागे फिरत असतात. सर्वसामान्य माणसांसाठी पोलीस राहिलेले नाहीत अशी शंका यायला लागली आहे. पोलीस पेट्रोलिंग वाढलं पाहिजे. लहान मुलींवर, शाळेतल्या मुलींवर अत्याचार होत आहेत. हे काय सुरू आहे. मागच्या ४-५ वर्षामध्ये हे प्रकार वाढले आहेत. पुण्यामध्ये एका बाईची चेन स्नॅचरने चेन ओढली आणि त्यातलाही तुकडा खाली पडला तर तो परत मागे आला. म्हणजे माणसं मदत करणारी राहिलेली नाही. कुठेही पोलिसांचा धाक राहिला नाही. पोलिसांना सर्वसामान्य माणसाच्या रक्षणाची जबाबदारी राहिलेली नाही. शिक्षेची भीती लोकांमध्ये नाही. स्वत: कायदा हातात घेऊन असा प्रकार करणे क्रूरतेची परिसीमा आहे. या घटनेमध्ये दोषीला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे.