विधानसभा अध्यक्षपदी अॅड. राहुल नार्वेकर यांचीच फेरनिवड केली जाईल, असे संकेत भाजपकडून देण्यात आले आहेत. विधानसभा सदस्यांच्या शपथविधीसाठी ७ ते ९ डिसेंबर दरम्यान मुंबईत अधिवेशन होणार आहे. राज्यपालांचे अभिभाषण व विधानसभा अध्यक्षांची निवड ९ डिसेंबरला होणार आहे. शिवसेना फुटीनंतर महायुती सरकार अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आले, तेव्हा अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होणार, हे लक्षात घेऊन पेशाने वकील असलेल्या नार्वेकर यांची निवड अध्यक्षपदी करण्यात आली होती. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेच्या याचिकांवर नार्वेकर यांनी निर्णय दिले. महायुतीकडे सध्या प्रचंड संख्याबळ असले तरी भविष्यात विधिमंडळात कोणतेही कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात.