बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरणी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाचा सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसेच आता या प्रकरणामध्ये आता नवा व्हिडिओ समोर आला आहे. आरोपींना साहित्य पुरवणाऱ्या बालाजी तांदळेचे CCTV फुटेज समोर आलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या व्हिडिओवरून राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
पोलीस त्याबाबतीत कोर्टात काहीच बोलले नाहीत- रोहित पवार यांचा सवाल
वाल्मीक कराडचे रोज नवीन व्हिडिओ समोर येत आहेत, कराडचा साथीदारांसोबतचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला. पण पोलीस त्याबाबतीत कोर्टात काहीच बोलले नाहीत. कराडवर कारवाई करण्याऐवजी आजारपणावर चर्चा सुरू आहे. जेणेकरून लोक मूळ विषय विसरतील असं वाटत आहे. असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवरही निशाणा साधला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
वाल्मीक कराडचे रोज नवीन व्हिडिओ येत आहेत पण पोलीस काहीच करत नाहीत. वाल्मीक कराडचा साथीदारांसोबतचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला. पण पोलीस त्याच्या बाबतीत कोर्टात काहीच बोलले नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ५ मिनीटांत वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली. वाल्मिक कराडला चांगल्या ठिकाणी राहता यावं त्यासाठी आता त्यांचं पोट दुखतंय म्हणतोय. त्याला इंजेक्शन, औषधी द्या. आजारपण असेल तर लगेच उपचार करा. पण त्याच्यावर कारवाई ऐवजी आजारपणावर चर्चा सुरू आहे.
देशमुख परिवाराला न्याय सरकार कमी पडतेय- रोहित पवार
देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. मात्र, त्यासाठी आता सरकार कमी पडत आहे. सरकारला असं वाटत आहे की जेणेकरून लोक मूळ विषय विसरतील. सरकारला त्याच्यावर कारवाई करायची की नाही शंका येते. सरकारला असं वाटतंय, राजाला असं वाटतंय की सुभेदाराला वाचवता येईल. वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदार सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी होऊन कारवाई व्हायला पाहिजे. बेल पाहिजे असली की गुन्हेगार आजारी पडतात. न्यायालयीन चौकशी व्हावी आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा.
काय आहे या व्हिडिओमध्ये?
बालाजी तांदळेने देशमुख प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला पाण्याच्या बाटल्या न्यायालयामध्ये दिल्याचे समोर आलं होतं. आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांना गेवराई येथील पोलीस कोठडीत ठेवले होते. त्यावेळी आरोपींना लागणारे साहित्य हे बालाजी तांदळेने दुकानातून खरेदी केल्याचं या सीसीटीव्हीतून समोर आलं आहे.