विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवार लवकरच भाकरी फिरवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पक्षातील युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष यासह विविध सेलचे प्रमुख बदलणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत देखील चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र पक्षातील एका गटाचा जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष हवे म्हणून आग्रह असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ८ आणि ९ जानेवारीला मुंबईत जंबो बैठक आहे.
८ तारखेला सर्व सेल, आमदार, खासदार आणि विभागाच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. तर ९ तारखेला जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांना देखील बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. या दोन दिवसीय बैठकीत शरद पवार सर्वांची पक्षांतर्गत बदलाबाबत मतं जाणून घेणार आणि त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.