सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यासह सर्वत्र ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यावर्षी ज्वारीचे पिक देखील जोमात आले आहे. ज्वारी फेब्रुवारी मध्ये काढली जाते. कवळ्या हुरडा पार्ट्यांचा जोर सध्या ग्रामीण भागात वाढलेला दिसतो आहे. सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात सर्वत्र हुरडा पार्ट्यांचा जोर वाढलेला असतो.
सोलापूर जिल्ह्यातील हुरड्याला विशेष अशी मागणी आहे. पूर्वी शेतकरी आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना आपल्या शेतामध्ये हुरडा पार्टी देत असतं. आता या हुरडा पार्टीला व्यवसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हुरडा पार्ट्यांचे आयोजन केले जाते. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पुणे सांगली धाराशिव या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक हुरडा पार्टीसाठी सोलापूर जिल्ह्यात येतात.
हुरडा करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ज्वारीशी कणसं कोळशावर भाजले जातात. ती गरम गरम कणसं हाताने चोळून त्यातील हुरडा वेगळा केला जातो. गरम गरम हुरडा शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, पेरू, बोर, गुळ, भाजलेले वांगे, भाजलेला कांदा, गोड शेव, खोबऱ्याची चटणी, फरसाणासोबत खायला दिला जातो. सोबत ताकाचा ग्लास ही असतो. आंबट - गोड हुरडा त्याबरोबर विविध प्रकारच्या चटण्या आणि फळांवर खवय्ये ताव मारतात. फाइव स्टार संस्कृतीच्या काळात देखील हुरडा पार्टी आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे.