अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्सच्या स्टारशीप रॉकेटच्या चाचणी दरम्यान स्पेसक्राफ्टचा हवेतच स्फोट झाला. स्टारशीपचे तुकडे होऊन जमिनीवर कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कंपनीच्या टेक्सास येथील बोका चिका या प्रक्षेपण केंद्रवरून या रॉकेटचे स्थानिक वेळेनुसार ५ वाजून ३८ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले होते. हे कंपनीचे या वर्षातील पहिले तर एकूण सातवे चाचणी उड्डाण होते.
टेक्सासमधील स्पेसएक्स मिशन कंट्रोलचा स्टारशिपच्या सुपर हेवी फर्स्ट स्टेज बूस्टरपासून अंतराळात वेगळे झाल्यानंतर उड्डाणाच्या आठ मिनिटांनंतर त्याचा संपर्क तुटला असल्याचे स्पेसएक्स कम्युनिकेशन्स मॅनेजर डॅन हुओट यांनी लाईव्ह दरम्यान सांगितले. दरम्यान स्टारशीपचे तुकडे होऊन ते जमिनीवर कोसळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. इलॉन मस्क म्हणाले की, "यश मिळेल याबाबत शाश्वती नसते, मात्र मनोरंजन होणार हे निश्चित."
रॉकेटमध्ये कोणीही व्यक्ती नसल्याचं स्पष्टीकरण
हे चाचणीचे उड्डाण असल्याने यामध्ये कोणीही व्यक्ती नव्हतं. स्पेसएक्स ने स्पष्ट केलं की स्टारशिपची अजूनही चाचणी सुरू आहेत. याचा वापर भविष्यातील चाचण्यांसाठी केला जाणार आहे. फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशन (FAA) ने स्टारशिपच्या अपयशाचे कारण शोधण्यास सुरूवात केली आहे. हा तपास पूर्ण झाल्यानंतर याविषयी अधिक माहिती दिली जाणार असल्याचं FAA ने म्हटलं आहे.