एसटी महामंडळाने नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे सांगत तब्बल १४.१३ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल. दरवाढीचा हाच टक्का कायम ठेवल्यास आज असलेल्या १०० रुपयांच्या तिकिटामागे १५ रुपये जादा मोजावे लागतील. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे आणला.