सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. चंद्रपूरच्या जनतेने वीज निर्मितीसाठी सहकार्य करायचे आणि सरकारने आम्हाला माती खायला लावायची, असे चालणार नाही, असा खरमरीत इशारा भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला दिला.
चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर गावातून वीज केंद्राला रोप वे च्या माध्यमातून कोळसा पुरवला जातो. हा रोप वे चाळीस वर्षे जुना आहे. त्यामुळे कोळशाची धूळ आणि आवाज याचा त्रास येथील लोकांना सहन करावा लागतोय. स्थानिकांनी यासंदर्भात मुनगंटीवार यांना तक्रार केल्यावर आज ते प्रत्यक्ष घटनास्थळी पोचले.
त्यांनी रोप वे आणि ध्वनी प्रदूषणाची स्थिती अनुभवली. त्यांनी लगेच वीज केंद्राच्या वरिष्ठांशी बोलून समस्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. मात्र हे करताना त्यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला. आम्ही शंभर वाघांचे सहाशे वाघ करू शकतो, तर वाघाचा पंजा पण मारू शकतो, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.