मुंबईत रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहराची जीवनवाहिनी ठप्प केली आहे. सलग चार ते पाच तासांच्या पावसामुळे सखल भाग पाण्याखाली गेले असून, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. माटुंगा स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.
गांधी मार्केट, वडाळा, सायन, हिंदमाता परिसरात पाणी साचल्याने गाड्या, दुचाकी अडकून बंद पडल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी झाडे व फांद्या कोसळून रस्ते अडले असून, नेपियन्सी रोडवर भिंत कोसळल्याने काही नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून विविध भागातील परिस्थिती तपासली आणि तातडीने पाणी उपसा केंद्र (पंपिंग स्टेशन) सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच रेल्वे सेवा पूर्णपणे बंद पडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आदेश दिले.
शहरातील महत्त्वाच्या चौकांमधील वाहतूक कोंडी, शाळा-महाविद्यालयांची स्थिती, आपत्कालीन पथकांची उपलब्धता यावरही त्यांनी चर्चा केली. दादर, कुर्ला, सीएसएमटी आणि सायन येथे प्रवासी वाढल्यास तात्काळ बेस्ट बसची व्यवस्था करण्यासही सांगितले. दुपारच्या सत्रातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून सकाळच्या सत्रातील विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचावेत यासाठी प्रशासकीय यंत्रणांना कामाला लावण्यात आले आहे.
मुंबई महापालिका, पोलीस व ट्रॅफिक विभाग यंत्रणा रस्त्यावर उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एकूणच मुसळधार पावसाने मुंबईतील रेल्वे व रस्ते वाहतुकीला मोठा अडथळा आणला असून, आपत्कालीन यंत्रणा सतर्कतेने काम करत आहेत. पुढील काही तास शहरासाठी निर्णायक ठरणार आहेत.