(Bharat Forecast System ) ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑरॉलॉजी’ (IITM), पुणे यांनी विकसित केलेली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ ही हवामान अंदाजासाठी अत्याधुनिक प्रणाली आता प्रत्यक्ष वापरात येणार आहे. विशेषतः पावसाळ्यात हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. ‘भारत फोरकास्ट’ ही प्रणाली स्थानिक पातळीवर सहा किलोमीटर रिझोल्यूशनमध्ये हवामान अंदाज देऊ शकते. यामुळे पर्जन्यमान, चक्रीवादळे, तीव्र उष्णता, वादळे यांसारख्या हवामान घटनांचा अधिक अचूक अंदाज वर्तवता येणार आहे.
या मॉडेलचा विकास 2017 मध्ये सुरू झाला होता. पारंपरिक 12 किमी रिझोल्यूशनच्या तुलनेत नवीन प्रणालीत त्रिकोणीय-क्यूबिक ऑक्टाहेड्रल (TCO) ग्रीडचा वापर करून, अधिक तपशीलवार व अचूक अंदाज वर्तविले जातात. विशेषतः भारतात, जिथे हवामानातील बदल अधिक तीव्र असतात, तिथे TCO ग्रीड रचना उपयुक्त ठरते. चाचणीत या प्रणालीने पावसाच्या अंदाजात 64% व अतिवृष्टीच्या बाबतीत 30% अचूकता दर्शविली आहे.
‘अर्का’ आणि ‘अरुणिका’ या उच्च क्षमतेच्या संगणकांच्या साहाय्याने या प्रणालीचे कार्य वेळेच्या तुलनेत अधिक जलद व प्रभावी झाले आहे. या प्रणालीचा वापर केल्याने कृषी, आपत्ती व्यवस्थापन, जलसंधारण, आरोग्य, वाहतूक अशा विविध क्षेत्रांत धोरणात्मक निर्णय अधिक प्रभावीपणे घेता येतील. ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ ही पूर्णतः भारतात विकसित झालेली जागतिक दर्जाची प्रणाली आहे.