थोडक्यात
लातूर जिल्ह्यामध्ये नदी,नाले ओढ्यांना पूर
अनेक गावांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली
(Latur Heavy Rain) राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढे, तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. लातूर जिल्ह्यातील मुख्य नद्या असलेल्या तावरजा, रेणा, मांजरा आणि तेरणा या नद्या दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय.
गाव खेड्यात जाणाऱ्या रस्त्यावरील अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. याचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून आवाहन करूनही नागरिक जीव धोक्यात घालवून पूल ओलांडत आहेत.
मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी शेती तळ्यासारखी दिसत असून सोयाबीनसह इतर पिकं पूर्ण उद्ध्वस्त झाली असून सतत पाण्यात राहिल्याने पिकं कुजून जातं आहेत. त्यामुळे आता पंचनामे नकोत, थेट मदत द्या, अशी मागणी शेतकरी प्रशासनाकडे करत आहेत