पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. मात्र, मोदींच्या या आवाहनानंतरही शेतकरी घरी जायला तयार नाहीत. जोपर्यंत संसदेत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत माघार नाहीच, असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.
राकेश टिकैत यांनी एक ट्विट करून ही घोषणा केली आहे. आंदोलन तात्काळ मागे घेतलं जाणार नाही. ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील, त्या दिवसाची आम्ही वाट पाहणार आहोत, असं टिकैत यांनी म्हटलं आहे. सरकारने एमएसपीसह शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा करावी, अशी मागणीही टिकैत यांनी केली आहे.
एमएसपीसाठी आंदोलन सुरूच राहणार
ऑल इंडिया किसान सभेचे महासचिव हन्नान मौला यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी या घोषणेचं स्वागत करत आहे. जोपर्यंत संसदेत कार्यवाही होत नाही. तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालीय असं म्हणता येणार नाही. केवळ या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला असं म्हणता येणार नाही. एमएसपीबाबतचं आमचं आंदोलन सुरू आहे आणि सुरूच राहणार, असं मौला म्हणाले.