Israel-Iran conflict : इराणचा सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर मोठा हल्ला
(Israel-Iran conflict ) इराणवर अमेरिकेने अणुस्थळांवर केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यानंतर, आता इराणने 36 तासांच्या आत जोरदार प्रतिहल्ला केला आहे. सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य करत इराणने मोर्टारद्वारे हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे.
इराणशी संबंधित एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सीरियाच्या पश्चिमेकडील हसाका या भागात असलेल्या अमेरिकन बेसवर हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर तळाच्या प्रवेशद्वारासह संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अद्याप या कारवाईची अधिकृत जबाबदारी कोणी घेतलेली नसली, तरी इराणने यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यांनुसार हा हल्ला त्यांचाच असल्याची माहिती मिळत आहे.
अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराणच्या नातानझ, फोर्डो आणि इस्फहान येथील अणु केंद्रांवर बी-2 बॉम्बर वापरून टार्गेटेड स्ट्राईक केला होता. अमेरिकन अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला इराणचा अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न थांबवण्यासाठी करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे आखातातील 19 देशांमध्ये लष्करी तळ आहेत, ज्यामध्ये सीरिया, सौदी अरेबिया, कतार, तुर्की आणि जॉर्डन यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी सुमारे 50,000 अमेरिकन सैनिक तैनात असून, तणावाच्या पार्श्वभूमीवर हे तळ संभाव्य धोक्याच्या छायेखाली आले आहेत. काही तळांवर इराणकडून आणखी मोठ्या पातळीवर हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.