Texas Plane Crash: टेक्सासच्या गॅल्वेस्टन एअरपोर्टवर भीषण अपघात; लँडिंगदरम्यान मेक्सिकन नौदलाचे विमान कोसळले
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील गॅल्वेस्टन खाडीमध्ये सोमवारी (२२ डिसेंबर) दुपारी मेक्सिको नौदलाचे वैद्यकीय विमान लँडिंगदरम्यान कोसळले, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातात २ वर्षाच्या चिमुकल्यासह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला असून, चार जणांना वाचवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ह्यूस्टनपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या गॅल्वेस्टन विमानतळावर लँडिंगसाठी येत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमान खाडीच्या पाण्यात कोसळले. अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळी तात्काळ बचाव मोहीम राबवली गेली. यात चार जण वाचले असून, त्यापैकी एक गंभीर जखमी आहे आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे टेक्सासच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
मेक्सिको नौदलाने स्पष्ट केले की, हे विमान वैद्यकीय मिशनवर होते. विमानात मिचौ आणि माऊ फांऊंडेशनचे दोन सदस्य होते, ही नॉन-प्रॉफिट संस्था गंभीर भाजलेल्या मेक्सिकन मुलांना मदत करते. संस्थेचे हे सदस्य २ वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन अमेरिकेत उपचारांसाठी निघाले होते. दुर्दैवाने, अपघातात चिमुकल्या मुलासह संस्थेच्या सदस्यांचाही मृत्यू झाला. विमानातील क्रू मेंबर्सची नेमकी संख्या अद्याप अस्पष्ट आहे.
अपघाताची कारणमीमांसा करण्यासाठी अमेरिका आणि मेक्सिकोच्या सुरक्षा एजन्स्या तपास सुरू करत आहेत. इंजिन बिघाड की खराब हवामान, याची खात्री करण्यासाठी तपासणी जोरदार चालू आहे. अपघातस्थळाभोवतीचा परिसर सील करण्यात आला असून, असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारच्या सुमारास हा अनर्थ घडला. या दुर्घटनेने दोन्ही देशांमध्ये शोककळा पसरली असून, मेक्सिकन नौदलाने मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गॅल्वेस्टन एअरपोर्टवर लँडिंगवेळी मेक्सिकन नौदलाचे विमान कोसळले
दोन वर्षांच्या चिमुकल्यासह पाच जणांचा मृत्यू, चार जण बचावले
विमान वैद्यकीय मिशनवर होते, तांत्रिक बिघाडाचा संशय
अमेरिका-मेक्सिको सुरक्षा यंत्रणांकडून संयुक्त तपास सुरू
