Pakistan Sanskrit : पाकिस्तानात थेट संस्कृत शिक्षण देण्याचा निर्णय, देशभर चर्चेला उधाण
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमधील राजकीय आणि संरक्षणातील दुरावा असला तरी सांस्कृतिक वारसा जोडणारा एक महत्त्वाचा निर्णय पाकिस्तानमध्ये घेण्यात आला आहे. लाहोर यूनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) या विद्यापीठाने पारंपरिक भाषांवर आधारित चार क्रेडिट कोर्सेस सुरू केले असून, यामध्ये संस्कृत भाषेचा समावेश आहे. भविष्यात येथे महाभारत आणि भगवद्गीतेवरही कोर्स सुरू करण्याचा विचार आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांच्या साझ्या संस्कृतीची ओळख वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फॉरमॅन ख्रिश्चन कॉलेजमधील समाजशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक शाहीद रशीद हे गेल्या अनेक वर्षांपासून संस्कृत कोर्स सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. स्वतः संस्कृत विद्वान म्हणून ओळखले जाणारे रशीद म्हणाले, "पारंपरिक भाषांमध्ये ज्ञानाचा सागर आहे. मी आधी अरबी आणि फारशीचा अभ्यास केला, नंतर संस्कृतचा. संस्कृतचे व्याकरण समजून घेण्यास मला एक वर्ष लागले." त्यांच्या मते, भारत आणि पाकिस्तानमध्ये संस्कृतसह पारशी-अरबी भाषांचा अभ्यास वाढला तर दक्षिण आशियात भाषेचा एक नवा सेतू तयार होईल. "भाषेला सीमा नसतात," असेही त्यांनी सुचवले.
LUMS च्या गुरमानी सेंटरचे संचालक डॉ. अली उस्मान कासीम यांनी सांगितले की, लवकरच महाभारत आणि भगवद्गीतेवर कोर्स सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. "आगामी १० ते १५ वर्षांत पाकिस्तानात गीता आणि महाभारताचे विद्वान तयार होतील," असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. द ट्रिब्यूनने याबाबत वृत्त दिले असून, हा निर्णय भारत-पाकिस्तान संबंधांना सांस्कृतिक पातळीवर नवे रूप देईल, असे मानले जात आहे.
पाकिस्तानातील LUMS विद्यापीठात थेट संस्कृत कोर्स सुरू
पारंपरिक भाषांवरील चार क्रेडिट अभ्यासक्रमांची घोषणा
भविष्यात महाभारत आणि भगवद्गीतेवर विशेष कोर्सची योजना
शाहीद रशीद यांच्या दीर्घ प्रयत्नांना यश
भारत-पाकिस्तान सांस्कृतिक नात्यांना नवे बळ मिळण्याची अपेक्षा
