ग्रामपंचायत निवडणुकीने अजित पवारांचे दिल्लीतील वजन वाढले का?

ग्रामपंचायत निवडणुकीने अजित पवारांचे दिल्लीतील वजन वाढले का?

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा भाजपसाठी समाधानकारक असून शिंदे व अजित पवार यांना सोबत घेतल्याने 40 टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळाल्याचा दावा भाजप कडून केला जात आहे
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

- सुनील शेडोळकर

मोठ्या झाडाखाली छोटे झाड वाढत नाही असा निसर्ग नियम सांगतो, राजकारणात ही मात्रा लागू पडेलच असं नाही. इथे छोटे झाड मोठेच काय मोठ्या झाडालाही छोटे करण्याची किमया शक्य आहे. कॉंग्रेस पार्टी यामुळेच कुठल्याही पक्षाबरोबर जाण्यापेक्षा एकट्याच्या बळावर मोठे होण्याचे तंत्र विकसित केले होते. त्यामुळे विरोधकांकडून मात मिळण्याचा कमी धोका असल्याचे कॉंग्रेसचा कार्यकाळ सांगतो. विरोधी पक्षांनी कितीही ठरवून कॉंग्रेसला बेदखल करण्याचे ठरवले तरी कॉंग्रेसने हे मनसुबे उलथवून टाकल्याचे अनेक वेळा घडलेले आहे. मात्र असे असूनही कॉंग्रेसला पराभवाचे तोंड बघावेच लागले आहे. राजकारण आणि सत्ताकारणात निवडणूक ही अपरिहार्य असते आणि निवडणुका म्हटले की हार-जीत ही आलीच. ज्या ज्या वेळी कॉंग्रेस हरली आहे ती स्वतःच्याच लोकांकडून हरली आहे. सत्ता म्हटले की वर्चस्व हे आलेच. प्रत्येक छोटे प्यादे हे वजिरापेक्षा राजाला चेक देण्यासाठीच बुद्धिबळाच्या पटावर उभे असते. एकच घराची चाल आणि राजा लक्ष्य हे बुद्धिबळात शक्य असले तरी राजकारणात मात्र वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. सतरंज्या उचलणारे निष्ठावान कार्यकर्ते कमी झाले आहेत सर्वच राजकीय पक्षात अपवादाने असे कार्यकर्ते दिसून येतात. राजकारण बदलले आहे. काही मिळवण्याच्या उद्देशानेच राजकारणात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जे हवे ते मिळाले तरी राजकारण ही न संपणारी भूक असली तरी कित्येक वर्षे राजकारणात घालविल्यानंतर महत्वाची पदं मिळावीत ही अपेक्षा सर्वमान्य समजली जाते, पण राजकारणात काही मिळू शकले नाही तरी जनतेचे पाठबळ हे सार्वभौम असते.

राजकारणी जितका साधा तितका तो लोकांना हवा असतो अशी कित्येक उदाहरणे महाराष्ट्रात देता येतील. सत्ता नसताना सतत लोकांचा गराडा पडणं ही राजकारण्यांची खरी श्रीमंती असते. गेल्या काही दशकांतील राजकारण बघितले तर महाराष्ट्रात शरद पवारांचे नाव अशी यादी असणाऱ्या नेत्यांत शरद पवारांचे नाव खूप वरच्या क्रमांकावर घ्यावे लागेल. गेली 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधी त्यांनी संसदीय राजकारणात घालविला आहे. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री पद भूषविणारे ते पहिले नेते आहेत. प्रवाहाविरुद्ध जात लोकांच्या सेवेत स्वतःला झोकून देताना शरद पवार सतत दिसतात. राज्याची खडा न खडा माहिती व प्रत्येक प्रश्नाची जाण असणारे नेते म्हणूनही शरद पवारांची ओळख आहे. स्वतः सत्तेत असताना ती सत्ता कशी राबवायची व स्वतः सत्तेत नसताना लोकांची कामे कशी करावी यात शरद पवारांचा हातखंडा आहे. बेरजेचे व हा शरद पवारांचा राजकारणातील स्थायीभाव राहिला आहे. आपल्या पक्षाचे कमी सदस्य आमदार-खासदार असतानाही देशपातळीवरील राजकारणात शरद पवार हे चालणारं नाणं आहे. जनतेशी नाळ जोडलेला नेता म्हणून राज्यात व केंद्रात त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. महाराष्ट्रातील राजकारणात यशवंतराव चव्हाणांनंतर लोकमान्यता मिळविणारे नेते म्हणूनही शरद पवारांकडे पाहिले जाते. व्यवहार चातुर्य आणि राजकारण यांची सुरेख सांगड घालत सत्तेत असो वा नसो सतत लोकांमध्ये राहात प्रत्येक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. सरकार चालवणं, ते टिकवून चालवणं , विविध प्रयोगांची निर्मिती करणे व वेळप्रसंगी विरोधकांनाही आपलेसे करण्याचे कसब ही शरद पवारांची कार्यपद्धती राहिली आहे. पुलोद सरकार, महाविकास आघाडी सरकार हे नवे प्रयोग केवळ शरद पवारच करु शकतात. पण, आपलाच पुतण्या असलेले अजित पवार यांनी बंड करून शरद पवारांना आव्हान दिले असून भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी करून घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच अजित पवार ताब्यात घेऊ इच्छितात.

ग्रामपंचायत निवडणुकीने अजित पवारांचे दिल्लीतील वजन वाढले का?
राष्ट्रवादी काँग्रेस फोडून देवेंद्र फडणवीस यांनी चूक केली का?

2019 नंतर महाराष्ट्रातील राजकारण बदलले आहे. कधी नव्हे एवढी राजकीय कुरघोडी गेल्या पाच वर्षांत बघायला मिळाली आहे. राजकीय पक्षांची सत्तेसाठी फोडाफोडी यापूर्वीही महाराष्ट्राने बघितली आहे, शरद पवारांनी यापूर्वीही अन्य पक्ष फोडलेले आहेत पण 2019 पासून जे सुरु आहे ते महाराष्ट्राने कधीही अनुभवले नव्हते. भारतीय जनता पक्ष कधी नव्हता एवढा आक्रमक या काळात बघायला मिळत आहे. एखाद्याने जर राजकारणात धोका दिला असेल तर हिशेब चुकता करण्यासाठी जनतेचा दरबार आहे. राजकीय पक्ष कसे वागत असतात हे मतदार बघत असतात. एक मताने अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडणाऱ्यांना पुढच्या निवडणुकीत धडा शिकवल्याचा इतिहास साक्षीला असताना भारतीय जनता पक्षाने सबुरीचे धोरण स्वीकारण्याऐवजी तोडफोडीचे राजकारण स्वीकारले. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाने शरद पवारांशी थेट दोन हात करत अजित पवारांना सोबत घेत 40 आमदारांचे पाठबळही घेतले.

राजकारणात अनेकांना कात्रजचा घाट दाखविणारे शरद पवारांना आज आपल्याच पक्षाच्या वैधतेसाठी आपल्या पुतण्याच्या विरोधात न्यायालयीन लढाईस मजबूर व्हावे लागले आहे. अजित पवार हे शरद पवारांच्या मुशीत तयार झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रमांक दोनचे नेते. 2019 साली महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा कॉंग्रेस पक्षांमुळे घोळ सुरू असताना कॉंग्रेसला वठणीवर आणण्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पहाटेच्या शपथविधीसाठी पाठवून कॉंग्रेसला शिवसेनेसोबत येण्यास राजी केले होते. 72 तासांत अजित पवारांना परत आणून उपमुख्यमंत्री केले. शरद पवारांची सत्तेची ही कुटनीती शरद पवारांवर उलटविण्यासाठी भारतीय जनता पक्ष गळ टाकून बसला होता. जनतेच्या दरबारात त्याचा योग्य निवाडा लागलाही असता पण भाजप तोपर्यंत वाट पाहण्यास तयार नसल्यामुळे पवारांच्या गनिमी काव्याला उघडपणे पक्षात फूट पाडून शरद पवारांच्या सद्दीला त्यांच्याच घरातून सुरुंग लावला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने महाराष्ट्राची सत्ता मिळवली होती, पण शरद पवारांचा 2019 चा हिशेब बाकी असल्यानेच अजित पवारांना 40 आमदारांसह बाजूला करण्यात यश मिळवले. शिवसेना या शहरी पक्षाशी 25 वर्षांचा संसार थाटून सत्ता उपभोगून आपले राजकीय बस्तान बसविले. अजित पवारांना सोबत घेण्याचीही भाजपची रणनीती असणार.

कॉंग्रेस सोबत अनेक वर्षांची सोबती करून त्याच विचारसरणीची कास धरून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. ग्रामीण महाराष्ट्र हे शरद पवारांचे बलस्थान आहे. अजित पवारांना बाजूला करून भाजपने आपला ग्रामीण जनाधार पुन्हा वाढविण्याचा चंग बांधलेला आहे. पुढील विधानसभा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढली जाईल असे कितीही भाजप सांगत असले तरी लोकसभेनंतरची समीकरणे बदलल्यास विधानसभेचीही बदलू शकतात. अजित पवारांना सोबत घेतल्याचा पहिला धक्का शरद पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीने दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अजित पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत जास्त यश मिळालेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ची ताकद जास्त आहे. तेथील ग्रामीण भागाशी नाळ जोडण्यासाठी अजित पवार हे जास्त उपयोगाचे ठरू शकतात असा भाजपचा अंदाज खरा ठरला. त्यामुळेच डेंग्यूच्या आजारपणातून बरे होऊन दिवाळी निमित्त कौटुंबिक भेटीत शरद पवारांशी चर्चा करुन थेट दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले. शरद पवारांशी झालेल्या या चर्चेने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले. पाचच महिन्यात देशात लोकसभा निवडणुका आहेत. नरेंद्र मोदी तिसरी टर्म साठी वेगवेगळे हतखंडे वापरत आहेत.‌ तर विरोधक 28 पक्षांची एकजूट करून मोदींना 2024 साठी रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इंडिया आघाडीत शरद पवारांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठीच अजित पवारांना भाजपने फोडले आहे.‌ अजित पवारही तोफेच्या तोंडी नेहमी मलाच दिले जायचे असा थेट आरोप काकांवर लावून मोदी-शहा यांच्या अधिक जवळ जात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा भाजपसाठी समाधानकारक असून शिंदे व अजित पवार यांना सोबत घेतल्याने 40 टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळाल्याचा दावा भाजप कडून केला जात आहे आणि त्यामुळेच दिल्लीश्वरांच्या लेखी अजित पवारांचे वजन वाढले आहे. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक खासदार देणारे राज्य आहे व तेथून 45 जागा मिळाव्यात अशी भाजपची इच्छा आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे व अजित पवारांना दिल्लीतून बळ दिले जात आहे. त्यामुळे शरद पवार जर कायदेशीर बाबींमध्ये अडकून राहिले त्याचा थेट परिणाम हा इंडिया आघाडीवर व्हावा हाही उद्देश भाजपचा आहे. त्यामुळे 5 महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार जर उपयोगी पडले तर विधानसभेसाठी अजित पवारांनाही मोठी संधी मिळू शकते, त्यामुळे पाहूया पाच वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. दिल्लीत अजित पवारांचे वजन वाढल्याचा परिणाम त्यांना बढती मिळून मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com