नवाब मलिकांच्या जामिनामुळे शरद पवारांचा एनडीए प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार का?
- सुनील शेडोळकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि शरद पवारांच्या खास मर्जीतील नवाब मलिक यांचा अखेर 17-18 महिन्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते असताना २०२१ च्या दिवाळीपूर्वी अमृता फडणवीस यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्यावर विधानसभेत बोलताना नवाब मलिकांनी लावलेल्या या लवंगी फटाक्याचा बॉम्ब दिवाळीनंतर मी फोडेन, असे खुले आव्हान सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिले आणि दाऊदची बहीण हसीना पारकरची जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिक यांची चौकशी झाली व पाठोपाठ त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर अनेक वेळा नवाब मलिकांनी जामिनासाठी अर्ज केला पण तो मिळू शकला नाही. अगदी आजारपणाचे कारण सांगूनही जामीन मिळू शकला नाही पण शुक्रवारी पाच वाजताची नमाज नवाब मलिकांसाठी फायद्याची ठरली व त्यांचा जामीन मंजूर झाल्याची बातमी धडकली आणि दुसऱ्याच दिवशी भर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपले पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली.
काकांनी पुतण्याची भेट घेणं आणि ती ही तब्बल चार-पाच तासांची? वाऱ्याच्या वेगाने या भेटीची खबर माध्यमापर्यंत पोहोचली किंवा ती पोहोचविण्यात आली याचे काय काय संदर्भ लावायचे ते लावून झाल्यानंतर रविवारी शरद पवारांनी आपण भाजपसोबत जाणार नाहीच असं ठासून पत्रकार परिषदेत सांगितले, पण हेच वाक्य चोरडियांच्या घरातून बाहेर पडतानाच पवारांनी सांगितले असते तर एवढा गहजब झाला नसता. काका - पुतण्यात घरगुती बैठक झाली, असे रोहित पवारांचे मत विचारात घेतले तर तिथे जयंत पाटलांना का बोलावले असेल हे ना रोहित पवारांनी सांगितले ना शरद पवारांनी ना अजित पवारांनी. शिवाय आपला शासकीय एस्कॉर्ट सोडून अजित पवार खाजगी गाडीतून मागच्या सीटवर झोपून गेले, कोणती घरगुती चर्चा जयंत पाटलांना बोलावून शरद पवारांनी अजित पवारांशी केली असेल याचे उत्तर महाराष्ट्राला अजून तरी मिळालेले दिसत नाही, पण याचे संदर्भ मागील काही घटनांशी जोडले तर वेगळे काही चित्र तर तयार होत नाही ना? अशी शंका अनेकांना येऊन गेली.
शरद पवार देशाच्या राजकारणातील चाणक्य समजले जातात, महाराष्ट्रात तर त्यांच्या पडणाऱ्या प्रत्येक पावलाखालील जमिनीत कोणते राजकीय पीक येणार वा उद्ध्वस्त होणार याचे शाश्वत धडे दिले व घेतले जातात असे राजकीय जाणकार सांगतात. शरद पवार आम्ही भाजपसोबत जाणार नाही याचेही दोन अर्थ लगेच महाराष्ट्राने काढायला क्षणाचाही विलंब लावला नाही. शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध कृती करतात असा त्यांच्या पूर्वानुभवावरुन अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. जी पहाटेची शपथ अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत घेतली त्याही वेळी असेच वेगवेगळे अर्थ काढले गेले. भाजप कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतो हे दाखवायचे होते असे ते आधी म्हणाले आणि नंतर ती माझी गुगली होती असे सांगितले. पन्नास वर्षांचे राजकारण पायदळी तुडवणाऱ्या शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर म्हणूनच प्रत्येक वेळी प्रश्न चिन्ह लावला जातो. अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीसाठी पाठविण्यात आल्याचा निष्कर्ष त्यानंतर निघाला. अजित पवारांमुळे पार्टी अॅण्ड फॅमिली स्प्लीट असे भलेमोठे ट्वीट करणाऱ्या सुप्रिया ताई चारच दिवसांनी अजित दादांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी हजर होत्या. यालाच राजकारण म्हणतात याचे नवे धडे महाराष्ट्रातील तरुण पिढीला दिले गेले.
अजित पवार याच टर्ममध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत. नरेंद्र मोदींविरोधात 2024 साठी 26 पक्षांची मोट बांधण्यात येत असून त्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची आहे, ही मोट कुणासाठी बांधायची? असा खुला सवाल अजित पवारांनी आपल्या काकांना केल्यानंतरच शरद पवारांनी अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवण्याची व विरोध घडवून ती पुन्हा स्वीकारायची अशी रणनीती आखल्याचे जाणकार सांगतात. अजित पवारांना स्पष्टवक्ता म्हणून महाराष्ट्रात राजमान्यता व लोकमान्यता आहे. नरेंद्र मोदींना 2024 अवघड नाही हे शरद पवारांनाही माहीत आहे, म्हणूनच ते मोदींशी संपर्क ठेवून आहेत.
खात्रीलायक लोकांनी सांगितल्यानुसार नवाब मलिकांना तुरुंगातून बाहेर काढले तर शरद पवार एनडीए सोबत येण्यास तयार होतील, असा विश्वास नरेंद्र मोदींना दिला गेला आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी नुकतेच पुण्यात येऊन गेले. मोदी येण्यापूर्वी व मोदींच्या येऊन गेल्यानंतर असे दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेले. पुण्यातील केंद्रीय सहकार पोर्टलच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवारांनी येण्यास उशीर केला असे वक्तव्य करून ही नव्या राजकारणाची नांदी तर नाही ना? अशी शंकेची पाल अनेकांना चुकचुकली, त्यानंतर आठच दिवसांनी गेले कित्येक महिन्यांपासून जामिनासाठी झगडत असलेल्या नवाब मलिकांना जामीन मंजूर झाला कदाचित हा योगायोग ही असू शकतो, पण राजकारण केव्हा ताटात येईल अन् ताटातून वाटीत जाऊन जेवण सुग्रास बनवेल याचा नेम नाही. आपला सहकारी नवाब मलिक तुरुंगात असून याचा आपल्या मुस्लिम जनाधारावर परिणाम होऊ शकतो हे शरद पवारही जाणून आहेत. त्यामुळे नवाब मलिकांच्या सुखरूप बाहेर येण्याला 2024 शी जोडले जात तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.
नरेंद्र मोदींना पण पवारांपासून धोका नाही, म्हणूनच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष, पक्षचिन्ह सर्व काही मिळाले, तसे अजित पवारांनी बंड करुनही काका पुतण्यात भेटी होतायत, चर्चा होतेय व शरद पवारही आमचा पक्ष फुटला नसल्याचे शपथपत्र निवडणूक आयोगाला देतात आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांची व अजित पवारांची बाजू मांडतात हे उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढविणारे आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आयोजन व्यवस्थेचे ओझे शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आधीच टाकले आहे, त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाहीच असं सांगून उद्धव ठाकरे यांना धीर देण्याचा प्रयत्नही केला जातोय का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे 2024 साठी शरद पवार नेमकं काय करणार याचा अंदाज लावला जात आहे.
सुप्रिया सुळे यांनी भाजपने आपल्या 9 वर्षांत विरोधी पक्षांची 9 सरकारं पाडल्याचा आरोप संसदेत करताच महाराष्ट्रात सरकारं पाडण्याचा शुभारंभ हा शरद पवारांनीच सुरू केल्याची आठवण अमित शहांनी करून देऊन पवारांच्या जखमेवर बसलेली खपली पुन्हा काढली तर अजित पवार म्हणतात की, 2024 ला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही आणि नवाब मलिकांना जामीन मिळतो व काका पुतण्याला भेटायला जातात. राजकारणाच्या सारीपाटावर कोणती सोंगटी कोणत्या प्याद्याला मारते का पुढील चाल देते हेच कळेनासे झाले आहे. बघूयात 2024 च्या रणांगणात कोण कोणासाठी आहे व कोण कोणाविरोधात? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे आपल्या सोंगट्या कशा फिरवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे...!