Crime News: धक्कादायक! दोन्ही डोळे बाहेर काढले, गुप्तांग चिरडले; बिहारमध्ये एका व्यक्तीची निर्घृण हत्या
बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मांझी नगरपंचायतीच्या दक्षिण टोल्यात एका मध्यमवयीन व्यक्तीच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे. ५५ वर्षीय सूरज प्रसाद यांची गुन्हेगारांनी क्रूरपणे हत्या केली असून, त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह बेडखाली सापडला. गुन्हेगारांनी त्यांचे दोन्ही डोळे बाहेर काढले आणि गुप्तांग चिरडले. सूरज प्रसाद गेल्या दहा वर्षांपासून गावाबाहेरील बागेत एका छोट्या खोलीत एकटाच राहत होते, तर कुटुंब छपरा शहरात कार्यरत आहे.
बुधवारी सकाळी शेजारील नातेवाईकांनी त्यांना जेवण देण्यासाठी जेव्हा खोलीत प्रवेश केला. तेव्हा दरवाजा उघडा आढळला आणि आत बेडखाली मृतदेह पडलेला दिसला. शरीरावर गंभीर जखमा होत्या. कुटुंबातील पत्नी, दोन मुले आणि तीन मुली घटनास्थळी पोहोचल्या. मृताचा पुतण्या पंकज प्रसाद यांनी सांगितले की, ही हत्या रात्री झाली असावी. मांझी पोलिस ठाण्याला तात्काळ माहिती देण्यात आली. सारणचे एसएसपी डॉ. कुमार आशिष यांनी सांगितले की, तपास वेगाने सुरू असून लवकरच मारेकऱ्यांना पकडले जाईल.
फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली आणि रक्ताने माखलेली माती, पुरावे गोळा केले. मांझी पोलिस स्टेशनचे प्रमुख देव आशिष हंस म्हणाले, "ही पूर्वनियोजित क्रूर हत्या दिसते. बागेत खोली असल्याने गुन्हेगार मृताला चांगले ओळखत होते किंवा त्याचा दीर्घकाळ पाठलाग करत होते." मृतदेह छपरा सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिस जवळच्या रहिवाशांची चौकशी करत असून संशयितांची ओळख पटवत आहेत. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप पसरला असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
