Indian Politics: बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा ‘पंतप्रधान’ म्हणून उल्लेख; नेमकं काय घडलं?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
राज्यात आणि देशाच्या राजकारणात १९ डिसेंबर या तारखेबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठी उत्सुकता होती. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याच दिवशी देशात मोठा राजकीय बदल होईल आणि मराठी माणूस पंतप्रधान बनेल, असा दावा केल्यानंतर आजच्या घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अशातच एका सार्वजनिक कार्यक्रमात घडलेल्या प्रसंगामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले.
एका कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदाल भाषण करत होते. भाषणाच्या ओघात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चुकून “पंतप्रधान” असा केला. जिंदाल म्हणाले, “पंतप्रधान मला बोलले होते की आपल्याला ५०० मिलियन टन स्टील तयार करायचं आहे. ३०० मिलियन टनवर थांबायचं नाही. आपण चीनपेक्षा कमी नाही. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे आणि जगासाठी स्टील बनवायचं आहे.” त्यानंतर त्यांनी पुन्हा, “आज आपण पंतप्रधानांना ऐकायला आलो आहोत,” असंही वक्तव्य केलं.
हा उल्लेख ऐकताच सभागृहात काही क्षण शांतता पसरली आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही क्षणभर अवाक् झाले. मात्र लगेचच आपली चूक लक्षात येताच सज्जन जिंदाल यांनी ‘सॉरी’ म्हणत दुरुस्ती केली. “मुख्यमंत्र्यांना ऐकायला आलो आहोत, माझ्याकडून तोंडातून चुकीने शब्द निघाला,” असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पुढे बोलताना, “एक दिवस देवेंद्र फडणवीस नक्कीच पंतप्रधान होतील,” असं विधान केलं. तसेच हिंदू परंपरेनुसार जीभेवर सरस्वती विराजमान असते आणि तोंडातून निघालेला शब्द खरा ठरतो, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या भाकितामुळे या घटनेला विशेष महत्त्व दिलं जात आहे. चव्हाण यांनी १९ डिसेंबर रोजी देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, पंतप्रधान बदलेल आणि तो मराठी माणूस असेल, अशी शक्यता व्यक्त केली होती. ही व्यक्ती भाजपचीच असू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
या पार्श्वभूमीवर एका बड्या उद्योगपतीकडून त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांचा ‘पंतप्रधान’ म्हणून झालेला उल्लेख हा केवळ योगायोग आहे की भविष्यातील एखाद्या मोठ्या राजकीय घडामोडीची नांदी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमधील संभाव्य पंतप्रधानपदाच्या दावेदारांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव आधीपासूनच चर्चेत आहे. त्यामुळे या घटनेनंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.
