'शिंदे सरकार म्हणजे घोषणा सरकार, फक्त बसेसवर स्वतःचे फोटो लावण्यात व्यस्त'
मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांच्या पाग येथील घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. यंत्रणेचा गैरफायदा घेणं चुकीचं आहे. जो बोलतो त्याला आत टाका, चौकशी करा हेच सुरु आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला. आज सकाळी मला कळालं की 11:30 वाजेच्या आसपास पोलीस बंदोबस्त काढला गेला. त्यानंतर हल्ला झाला. यामागे कोणता राजकीय हेतू आहे का याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तसेच, यंत्रणेचा गैरफायदा घेणं चुकीचं आहे. ज्या विषयाला उत्तर नाही देऊ शकत. जो बोलतो त्याला आत टाका, चौकशी करा हेच सुरु आहे. राज्याच राजकारण इतकं खाली कधी गेलं नव्हतं, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
शिंदे सरकारने गोररगरीबांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंद शिधाची घोषणा केली होती. परंतु, अद्यापही रेशन दुकानावर आनंद शिधा पोहोचलेला नाही. यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. या सरकार कडून काही अपेक्षा नाही. हे सरकार घोषणा सरकार बनलं आहे. स्वतःचे फोटो बसेसवर एसटीवर लावण्यात व्यस्त आहे, असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
पुण्यात तुफान पावसाने रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. यावरुन विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाऊस किती पडावा हे पालिका ठरवत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. याबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी आता सांगितलं जात आहे की राजकारण आणू नये. मुंबई तुंबली की शिवसेनेची चुकी असते. नेमकं का असं झालं याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
भाजपच्या दीपोत्सवाबाबत प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही जे आधी केलं तेच आता केलं जात आहे. अनेकांना आता वरळी आवडायला लागली आहे. जांभोरी मैदान आम्ही चांगलं केलं. पण, दहीहंडीला जशी वाट लावली तशी वाट आता लावू नये, असा खोचक सल्लादेखील त्यांनी भाजपला दिला आहे.