गडाखांच्या नेवाशात आदित्य ठाकरेंचं हळवं रुप, जनताही भावूक
Aditya Thackeray on Sandipan Bhumre : बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांच्या मदतारसंघात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत थेट आव्हान दिले. यावेळी त्यांनी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले, असे आवाहन बंडखोरांना केले. आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करुन दाखवलं. पण या गद्दारांनी काय केलं तर आपले चांगले काम करणारे सरकार पाडले, असा घणाघात आदित्य यांनी शिंदे गटातील आमदारांवर केला. यानंततर ते नगर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर गेले, यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले.
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेवासा मतदारसंघात भर पावसात त्यांची सभा झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी देऊ केलेली छत्री नाकारत त्यांनी भर पावसात भाषण केले. आणि म्हणाले की, माझ्यासाठी जनता पावसात भिजतीये, मी छत्री घेणार नाही, गडाखांच्या नेवाशात आदित्य ठाकरेंचं हळवं रुप पहायला मिळाले. (ahmednagar shivsena aaditya thackeray gadakh family newasa shiv samvad yatra)
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. यावेळी बिडकीन परिसरात शिवसैनिकांमध्ये कमालीचे चैतन्य संचारल्याचे दिसले. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतील ही सर्वात मोठी गर्दी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'डोक्यावर पाऊस पडत असला तरी त्यापेक्षा मोठा प्रेमाचा आणि आशिर्वादाचा पाऊस तुमच्याकडून सुरू आहे, तो मला महत्वाचा आहे. सरकार पडल्यावरही एवढे प्रेम मिळाले, हे पाहून मी भारावून गेलो आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी गद्दारी केली. त्यांना आपण काहीही कमी केले नव्हते. मात्र, त्यांच्यावर यासाठी काही दडपण असेल. असा टोला त्यांनी यावेळी लगावला.