बाळू धानोरकर पंचतत्वात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अनिल ठाकरे | चंद्रपूर : खासदार बाळू धानोरकर यांचं मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास नवी दिल्ली येथील वेदांता रुग्णालयात निधन झाले. आज सकाळी ११ वाजता खासदार धानोरकर यांची अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत हजारो नागरिकांचा जनसागर लोटला होता.
खासदार धानोरकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजताच्या सुमारास शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात वरोरा येथील मोक्षधाम येथे अंत्यविधी पार पडली. त्यांच्या पार्थिवाला मोठा मुलगा पारस यांनी मुखाग्नी दिली.आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी मोक्षधाम परीसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
लोकसभेचे सभापती यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी श्रद्धांजली वाहिली. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँगेस नेते राहुल गांधी यांच्या वतीने मुकुल वासनिक आणि अशोक चव्हाण यांनी शोक संदेश वाचन केले. आणि आपल्या नेत्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार विनायक राऊत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार शिवाजीराव मोघे मनसे नेते राजू उंबरकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांच्यासह राज्यातील आणि जिल्ह्यातील इतर नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.