छ. संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरेंची चौफेर टीका; वाचा भाषणातील प्रमुख मुद्दे
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पर पडली. या माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रांतअध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्रीअशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहिले आहेत. यावेळी मविआच्या सर्वच नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. याच सभेत बोलत असताना शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे?
२५ वर्षं आपण वेगळ्या भ्रमात होतो. भाजपाबरोबर आपली युती होती. दोनदा सरकार आलं. पण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं होतं का? म्हणून मला अभिमान वाटतो, मविआच्या सर्व नेत्यांना मी धन्यवाद देतो, आम्ही सोबत असताना जे भाजपाला जमलं नाही, ते मविआ सरकारनं करून दाखवलं आहे. याच एका गोष्टीवरून त्यांची वृत्ती कशी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. करायचं काही नाही फक्त कोंबडे झुंजवत बसायचं. निवडणुका आल्यावर जातीय तेढ निर्माण करायची. जातीय तेढ निर्माण झाली की समजा निवडणुका जवळ आल्या आहेत. अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख झाला. जरूर काढा. हल्ली महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश सुरू झाला आहे. मुंबईत काढला होता. मुंबईत कुठून काढला मला माहिती नाही, पण शिवसेना भवनापर्यंत आणला. मी म्हटलं याचा अर्थ एकच आहे. जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता, देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही देशातल्या हिंदूंना आक्रोश करायला लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची आहे? मविआचं सरकार होतं. हिंदू, मुस्लीम अशा कोणत्याही धर्मीयांना आक्रोश कऱण्याची वेळ आम्ही येऊच दिली नव्हती. असा निशाणाही त्यांनी सावरकर गौरव यात्रेवर साधला.
हल्ली काहींना डॉक्टरेटही मिळते. काहीजण पाण्याची इंजेक्शन घेऊन फिरतात. सोडून द्या त्यांना. पण आज अनेक तरुण पदवीधर होतायत. पदवी दाखवूनही एकीकडे किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी मागितली, तर २५ हजार दंड होतोय. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? कॉलेजलाही हा अभिमान असायला हवा की आमच्या कॉलेजमधला एक व्यक्ती पंतप्रधान झालाय. पदवी दाखवणार नाही, हा कुठला न्याय आहे? पदवीचा उपयोग काय दंड घेण्यासाठी करताय की काय? अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीवरून वार करतो? शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही घट्ट झालो आहोत. अमित शाहांनी पुण्यात म्हटलं की सत्तेसाठी मी तळवे चाटले. असं नाहीये की मी शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण काही शब्द, भाषा त्यांनाच शोभणारी आहे, मला ती शोभणार नाही. पण मी फक्त एवढंच म्हणालो, की आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय? अशा शब्दात त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाण साधला.
गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली ५० खोक्यांना. एका कांद्याला ५० खोके, तर त्या कांद्याच्या शेतकऱ्याला किती मिळाले पाहिजेत? हे सगळं तोतयेगिरीचं सरकार चालू आहे. जेव्हा हे महाराष्ट्रात अस्पृश्य होते, तेव्हा आम्ही त्यांना खांद्यावर घेतलं. नाहीतर यांना महाराष्ट्रात ओळखत कोण होतं? जेव्हा गरज होती तेव्हा भाजपानं आपल्याला वापरून घेतलं आणि माडीवर चढल्यावर आपल्याला लाथ मारतायत. त्याच तंगड्या धरून आपल्याला त्यांना खाली खेचायचंय आता. आज मी मुख्यमंत्री नाहीये. आपल्या पक्षाचं नाव, चिन्ह त्यांनी चोरलंय. एवढंच नाही, माझे वडीलही चोरायचा प्रयत्न करत आहेत. स्वत:च्या वडिलांना किती वेदना होत असतील. काय दिवटं कार्टं, याला बापसुद्धा दुसर्याचा लागतो. मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. पुन्हा एकदा सांगतो त्यांना. हिंमत असेल, अगदी भाजपातही हिंमत असेल, तर तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन महाराष्ट्राच्या मैदानात येतो. होऊन जाऊ द्याय. असे आव्हान त्यांनी भाजपला यावेळी दिले.
कशाला छत्रपतींचं नाव घेता? छत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराची ओटी भरून तिला परत पाठवली होती. ते आमचं हिंदुत्व आहे. पण तुम्ही सगळ्यांना छळता. धाडी टाकता. एक इथला गद्दार मंत्री सुप्रिया सुळेंना शिवी देतो, हे तुमचं हिंदुत्व? तुमचा एक गद्दार सुषमा अंधारेंबद्दल खालच्या पातळीची टीका करतो. तुझ्या तोंडून हिंदुत्व बोलायची लायकी नाही. आत्ता जर हे शिवसेनेत असते, तर त्यांची तसं बोलायची हिंमत नव्हती. त्यांना लाथ मारून गेटआऊट म्हटलं असतं. मतं पटत नसतील, तर मतांवर बोला. पण महिलांविषयी बोलणं खपवून घेतलं जाणार नाही. अशा लोकांनी गौरव यात्रा काढावी. हे शोभत नाही. असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
नड्डा म्हणाले शिवसेनेला नामशेष करा. आधी तुम्ही शिवसेना पेलतेय का ते बघा. आम्ही भाजपा संपवल्याशिवाय राहणार नाही. मोठी केलेली माणसं गेलीत, पण त्यांना मोठं करणारी माणसं आज माझ्यासोबत आहेत. आता महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ राज्यघटनेचं, भारतमातेचं रक्षण करण्यासाठी आहेत. तुम्ही आम्हाला विचारताय याच्या थोबाडीत माराल का? आधी स्वत:च्या कानफटात मारून घे. आमचं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाहीये. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवाय हे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. असे देखील उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.