CM Eknath Shinde : 1 जुलैला मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाचा विराट मोर्चा; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दरोडे...
मुंबई: ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी 1 जुलैला मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराच्याविरोधात ठाकरे गट विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही.' अशी बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाच्या मोर्चावर केली.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
ठाकरे गटाच्या मोर्चाबाबत माध्यमांकडून मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही. गेल्या 15-20 वर्षे मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला. मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले, याचा हिशेब आता कॅग विचारणार आहे. एसआयटीची स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. दूध का दूध पानी का पानी होईल. उलटा चोर कोतवाल को दांटे असा प्रकार आहे. कॅगच्या ताशेऱ्यांवर एसआयटी लावली आहे, ती निष्पक्षपणे काम करेल, राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून कारवाई करणार नाही. मुंबईकरांचा मुंबईकरांच्याच तिजोरीत राहायला हवा. तो कोणालाही वळवता येणार नाही. ही केवलवाणी धडपड आहे.' अशी टीका त्यांनी ठाकरे गटावर केली.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
मुंबईकरांचा पैसा उधळला जातोय, वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. त्यावर कुणाचं नियंत्रण नाही. मुंबईला मायबाप कोणी राहिला नाही. या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, या भ्रष्टाचाराविरोधात मुंबई महापालिकेवर आम्ही मोर्चा काढू. आदित्य ठाकरे या मोर्च्याचं नेतृत्व करतील.' असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.