तोंड उघडले की फक्त...बाहेर पडते अशा लोकांची; केसरकरांचे राऊतांवर टीकास्त्र
अभिराज उबाळे | पंढरपूर : गद्दारांना लोकांनी पकडून रस्त्यावर मारलं पाहिजे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. यावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पांडुरंगाच्या पवित्र मंदिरामध्ये चांगल्या लोकांची नाव घ्या. ज्यांनी तोंड उघडले की फक्त....बाहेर पडते अशा लोकांची नाव घेऊ नका. अशी खरमरीत टिका केसरकारांनी संजय राऊत यांचं नाव न घेता केली.
मंत्री केसरकर यांनी आज पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी ब्बा विठ्ठला राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट दूर होऊ दे. बळीराजाला मदत करण्याची ताकद सरकारला मिळते, असे साकडे दीपक केसरकर यांनी विठ्ठलाला घातले आहे.
राज्यात नवीन शिक्षक भरती होणार आहे. तसेच यावर्षीपासून राज्याचे शैक्षणिक धोरण ही बदलणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या संस्था ताब्यात देण्याची तयारी खाजगी शिक्षण संस्थांची असेल तर सरकार ताब्यात घेईल, असेही त्यांनी सांगितले.
तर, अयोध्या दौऱ्यात काही आमदार उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले होते. परंतु, केसरकरांनी या चर्चांना फेटाळून लावत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कुणीही नाराज नाही. आपल्या वैयक्तिक कार्यक्रमांमुळे काही सदस्य अयोध्येला आले नाहीत, असा खुलासा त्यांनी केला.
दरम्यान, 2019 पासून ठाकरे सरकार पाडण्याचे काम सुरू होते, असं विधान आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्यावर देखील केसरकारांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे सरकार पाडण्यामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह प्रत्येकाचा वाटा असल्याचे केसरकरांनी खुलासा केला आहे.