पंतप्रधान मोदींकडून एम्स रुग्णालयाचं लोकार्पण
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स)चे भूमिपूजन १४ एप्रिल २०१७ रोजी पंतप्रधानांनी केले होते. आज राष्ट्राला ही संस्था समर्पित करण्यात आली आहे. मध्य भारतातील सर्व सुविधायुक्त ही आरोग्यसंस्था असून निर्मितीसाठी सुमारे १ हजार ५७७ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. याच कार्यक्रमादरम्यान सिपेट-सेंटर फॅार स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (सीएसटीएस) चंद्रपूरचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले आहे. राज्य शासनाने या संस्थेसाठी 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. सर्व सोईसुविधांनी युक्त ही संस्था आहे.
यासोबतच नागपुरात होणाऱ्या नॅशनल इंस्टिट्यूट फॉर वन हेल्थ या संस्थेचाही शुभारंभ करण्यात आला. तसेच सेंटर फॅार रिसर्च, मॅनेजमेंट अँड कंट्रोल आफ हेमोग्लोबिनोपॅथिस या चंद्रपूरच्या संस्थेची ऑनलाईन पद्धतीने उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान या संस्थांचे माहितीपट दाखविण्यात येणार आहेत.