मनसे सैनिकांनी कंत्राटदाराचे कार्यालय फोडल्यानंतर राज ठाकरेंचे नवे ट्विट चर्चेत
मुंबई : रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. आज मनसेच्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरेंनी आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे, असे आवाहन मनसे सैनिकांना केले होते. यानंतर माणगावमधील पहिल्या कंत्राटदारांचे कार्यालय मनसे सैनिकांनी फोडले आहे. यानंतर पुन्हा एक नवे ट्विट करत राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना आवाहन केले आहे.
राज ठाकरेंनी ट्विटरवर एक रस्त्यांवरील खड्ड्यांचा फोटो शेअर केले आहे. यासोबतच माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की, ह्या राज्यातील कोणताही महामार्ग असो की शहरातील अंतर्गत रस्ते असो, सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. तेव्हा ह्या खड्ड्यांमध्ये झाडं लावा, किमान ह्यामुळे तरी प्रशासनाचं रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे लक्ष जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. तर, माणगाव मधील चेतक व सन्नी कंपनीचे कार्यालयही मनसे स्टाईलने फोडण्यात आले आहे.