लोकशाही कशाला म्हणतात...; भावी अधिकाऱ्यांसमोर राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी
मुंबई: प्रभादेवी येथे तेजपर्व या संस्थेने युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना राज ठाकरे यांनी विविध विषयावर भाष्य केले. तेव्हा त्यांनी लोकशाहीचा अर्थ सांगताना मिश्किल टिप्पणी केली.
काय म्हणाले राज ठाकरे?
यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकशाही कशाला म्हणतात, हे आज तुम्हाला कळाले असेल. ज्या व्यक्तीला दहावीत ४२ टक्के पडलेत तो आज आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करतो. राज ठाकरे असे म्हणताच त्याठिकाणी एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या गुणवंतांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुढे त्यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, "एकदा मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर काही अधिकारी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होते. यावेळी तेथे पत्रकारही होते. त्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिव्या का घालत आहात. त्यावर त्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं की, असूद्या, मी पर्मनंट आहे, ते टेंम्पररी आहेत. तुम्ही तुमची ताकद ओळखा. असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.