अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट नव्या चिन्हा सोबत सज्ज, गुरुवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु आहे. अशातच काल निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवे नाव दिले आहे. नावासोबतच दोन्ही गटाला चिन्ह देखील देण्यात आले आहे. या नावाच्या पेचाआधी आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यामुळे बंडखोरीनंतर ही पहिली निवडणूक असल्यामुळे दोन्ही गट आता नव्या नावाने, चिन्हाने या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी आता ठाकरे गट गुरवारी अर्ज करणार आहे.
शिवसेना ठाकरे गट मशाल या नव्या चिन्हासह अंधेरी पूर्व मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी आता शिवसैनिक नव्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज झाले आहेत.
नव्या चिन्हासह ठाकरे गट रिंगणात
शिवसेना ठाकरे गटाला मशाल मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा आनंद असल्याचे दिसून येत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गट शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे गटाला पाठिंबा
शिवसेना ठाकरे गटाच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना राष्ट्रवादीसोबत काँग्रेसने देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे.
तर भाजपने या निवडणुकीत मुराजी पटेल या उमेदवाराची घोषणा केली आहे. पटेल यांनी निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने अद्यापही याबाबत कोणीतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही.