आक्रस्ताळे, लंपट जोकर, विदूषकी चाळे...; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर पलटवार
मुंबई : विदूषकांची टोळी राज्यात फिरतेय यात पहिले आहेत संजय राऊत, दुसरे भास्कर जाधव आणि तिसरे विदूषक उद्धव ठाकरे आहेत, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ यांच्याकडून विदूषकी चाळ्यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही, असा पलटवार सुषमा अंधारेंनी केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, बुद्धिमान लोक बुद्धीने प्रतिवाद करतात. आक्रस्ताळे, लंपट जोकर विदूषकी चाळे करतात. चित्रा वाघ सारख्या जोकर कडून काही वेगळी अपेक्षाच नाही. मुद्दा फडणवीसांचा आहे. किती दिवस चित्रा, नितेश, नवनीत, गुणरत्न अशा जोकरछाप लोकांच्या मागे लपून घाणेरडे राजकारण करणार आहात, असा खोचक सवालही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
स्वतःच्या सडलेल्या बुद्धीचा भोपळा बाहेर आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. ना घर का, ना घाट का, अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झालीय. विदूषकांची टोळी राज्यात फिरतेय. यात पहिला विदूषक खासदार संजय राऊत, दुसरा विदूषक भास्कर जाधव आणि तिसरा विदूषक उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंकडे दुसरे काम उरलं नाही, म्हणून ते करमणूक करत आहेत. उद्धव ठाकरे यांना आम्ही जोकरचा ड्रेस पाठवत आहोत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती.