70 वर्षे वाटोळं केलं; जरांगे पाटलांचे टीकास्त्र, नादाला लागू नका
धाराशिव : आरक्षणामुळे जीवन उद्ध्वस्त झाले. आता नाही तर कधीच नाही. हे पाहिलं अन् शेवटचं आंदोलन. अजून झुंजायचं हे ठरवून सामान्य मराठा आंदोलनात उतरला. ज्याला मोठ केलं तो विरोधात उभा राहिलं. जो आमचा त्याला मोठ करू हे आता मराठ्यांनी ठरवलं. 24 डिसेंबरला सरसकट आरक्षण मिळणार आहे, असा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज धाराशिवमध्ये त्यांची जाहिर सभा पार पडली.
ज्या-ज्या वेळेस समित्या झाल्या तेव्हा मराठ्यांकडे कागदपत्रे नाहीत, असं सांगितलं. 70 वर्षात नोंदी सापडत नव्हतं त्या सापडल्या आहेत. आता कशा नोंदी सापडल्या उत्तर द्या. 70 वर्षात आमचं वाटोळे करणारे कोण, असा सवाल मनोज जरांगेंनी विचारला आहे. आरक्षण असतं तर सर्वात प्रगत मराठा समाज असता. नोंदी असल्या तरी नाही म्हणायचं आणि आरक्षण नाही अस सांगायचं हा डाव हाणून पाडला, असे त्यांनी म्हंटले आहे.
24 डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे. आरक्षण नाही दिल्यास 25 डिसेंबरला ठरवू काय करायचं. आम्हाला फक्त बघायचं मुंबई कशी आहे? मंत्री कोणत्या मंत्रालयात कसे बसतात? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री 24 तारखेच्या आत शंभर टक्के आरक्षण देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारचेच मंत्री सांगतात करा आंदोलन आम्ही आहोत. धनगर बांधव आपल्या बाजूने उभे राहिले आपण त्यांच्या बाजूने राहू. मुस्लिम, बंजारा समाजाच्या बाजूने राहू. ग्रामीण भागातील ओबीसींचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
मराठा समाजाच्या पोरांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं, म्हणून हा लढा सुरू केला आहे. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार. 70 वर्षे मराठा समाजाचं वाटोळं झालं आणि आपणच जर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून जीवन संपविणार असाल तर हे आरक्षण कुणासाठी मिळवायचं? त्यामुळं यापुढं कोणीही मरायचं नाही आणि संयमही सोडायचा नाही. उग्र आंदोलन तर मुळीच नको. शांततेच्या मार्गाने सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, असा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठ्यांच्या नादाला लागू नका, पराभव होईल. जर मराठ्यांनी हातात घेतलं तर तुम्हाला फाडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.