Sanjay Raut : ठाकरे बंधूची युती कधी होणार? संजय राऊतांनी सांगितले...
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेंच्या नेत्यांवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य करत मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचा निर्णय घेतला जाईल असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
राऊत म्हणाले, "काल जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमाने अंगात उत्साह संचारला आहे. ट्रीटमेंट चालूच राहील. ही लढाई मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई आहे. मराठी माणसाने मुंबई वाचवण्यासाठी उतरायला हवे." मुंबईत गेल्या काही दिवसांत 'मुंबई वाचवा' असे पोस्टर्स लावले गेले, ज्यात कोणत्याही पक्षाचे नाव नव्हते. मात्र, सरकारने एका रात्रीत ते काढून टाकले, कारण आचारसंहिता भंग होतेय, असा दावा करून. "आचारसंहिता मराठी माणसाला लागते का? विरोधी पक्षाला लागते का? की फक्त आम्हाला?" असा सवाल उपस्थित करत राऊतांनी सरकारवर हल्ला चढवला.
मनसे-ठाकरे युतीबाबत विचारले असता राऊत म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढत आहेत. महायुतीला दिल्लीत अमित शाहांकडून जाऊन युक्ती करा, बाबा लगीन करावे लागले. पण उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र आले आहेत. ही लढाई २९ महापालिकांपेक्षा मुंबईची आहे, असंही संजय राऊत म्हणाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मुंबई मुख्य केंद्र होती. आम्ही मराठी लोक पुन्हा बलिदान द्यायला तयार आहोत. पण मुंबई अमित शाहांच्या घशात जाऊ देणार नाही. रहमान डकैत कोण आहे, मुंबई कोणाला लुटायची आहे, ल्यारीसारखे कराचीचे शहर कोणी बनवले हे मुंबईला माहित आहे, महाराष्ट्राला माहित आहे आणि पूर्ण देशाला माहित आहे, असा घणाघात करत राऊतांनी मुंबई महापालिकेत गुन्हेगारी आणि बाहेरचांच्याच वाढत्या वर्चस्वावर टीका केली आहे.
आज संजय राऊत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही युतीची अधिकृत घोषणा लवकर होईल का, याकडे लक्ष लागले आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे गट एकजुटीने लढण्याची शक्यता वाढली आहे, ज्यामुळे निवडणूक रंगणार आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आज राज ठाकरे यांची भेट होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत कोणते मुद्दे चर्चेला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
