कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जिवीतहानी टळली
निसार शेख | खेड : कशेडी घाटात प्रवासी कारला अचानक आग लागून कार आगीत भस्मसात होण्याची घटना आज घडली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटामध्ये पोलादपूरच्या दिशेने निघालेल्या रेनॉल्ट लॉजी कारने अचानक पेट घेतल्यानंतर काहीच क्षणात कारला ज्वाळांनी चहूबाजूंनी लपेटले. यावेळी कारमधून गणपतीपुळे ते कोपरखैरणे असा प्रवास करणारे जोडप्यासह ८ प्रवासी सुदैवाने बचावल्याची माहिती कशेडी येथील वाहतूक पोलीस उपनिरिक्षक ए. पी. चांदणे यांनी दिली.
विष्णू सर्जेराव गरजे पत्नी प्रतिभा विष्णू गरजे व अन्य आठ प्रवासी रेनॉट लॉजी कारमधून (क्र. एमएच ४३ इडब्ल्यू ०७१०) गणपतीपुळे ते कोपरखैरणे असा प्रवास करत होते. यावेळी कारमधून जात असताना कारच्या बॉनेटमधून धूर येऊ लागल्याने सर्व प्रवासी गाडीमधून उतरून बाजूला थांबले. त्याचवेळी गाडीने चहूबाजूने पेट घेतला. यावेळी काही वेळातच गाडी संपूर्ण जळून खाक झाली. खेड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व सहकारी यांनी समक्ष येऊन भेट दिली. दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आली. मात्र, संपूर्ण कार जळून खाक झाली होती.