Supriya Sule: अजित पवार–शरद पवार युती होणार? सुप्रिया सुळेंचे स्पष्ट विधान
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. या चर्चांवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार गटासोबत युती होणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. सर्वच पक्षांसोबत चर्चा सुरू असून युतीबाबतचा निर्णय शरद पवार घेतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य असेल. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, पुण्यात अजित पवार गटासोबत युती करण्याबाबत शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद असल्याचे सांगत जागावाटपाची माहिती लवकरच समोर येईल, असे त्यांनी म्हटले.
मुंबईत मात्र वेगळे चित्र दिसत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटासोबतची युतीची चर्चा थांबवली असल्याची माहिती आहे. आता मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेससोबत युती करण्याची शक्यता आहे. सुरुवातीला मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट युती करणार असल्याची चर्चा होती, मात्र सध्या त्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे सांगितले जात आहे.
