Outram Ghat : औट्रम घाटात 2,600 कोटींचा बोगदा; 12.5 किमीचा प्रकल्प प्रस्तावित
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील औट्रम घाटात मोठा पायाभूत प्रकल्प उभारण्याची तयारी सुरु झाली आहे. या घाटात 12.5 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्याचा 2,600 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याचा अलायन्मेंट मंजुरीसाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (NHAI) मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
मंजुरी मिळाल्यानंतर डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) अंतिम केला जाईल आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती NHAI चे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांनी दिली.
या भागात रेल्वे आणि महामार्ग दोन्ही प्रकल्पांची एकत्रित चर्चा 4 एप्रिल ते 2 जून 2025 दरम्यान सुरू होती. मात्र आता दोन्ही विभाग आपले प्रकल्प स्वतंत्रपणे राबवणार आहेत. त्यामुळे बोगद्याच्या कामाची दिशा स्पष्ट झाली आहे.
नाशिक येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला. औट्रम घाटातून बोगदा बांधण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
सध्या औट्रम घाटातील जड वाहतुकीसाठी मार्ग बंद असून, वाहनांना 110 किलोमीटरचा फेरा घालावा लागतो. रोज सुमारे 22 हजार वाहने या मार्गावरून धावत असून, भविष्यात ही संख्या 40 हजारांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बोगद्याचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
रेल्वेमार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण सुरू
छत्रपती संभाजीनगर–चाळीसगाव दरम्यान प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी कन्नड तालुक्यातील चापानेर, जळगाव घाट आणि टाकळी लव्हाळी परिसरात रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार प्राथमिक सर्वेक्षण सुरू आहे. हे काम झारखंडमधून आलेल्या टीमकडून सुरू असून, इतर ठिकाणांचे सर्वेक्षणही नियोजित आहे. "बोगद्याच्या अलायन्मेंटसाठी प्रस्ताव आम्ही NHAIच्या मुख्यालयाकडे सादर केला आहे. मंजुरी मिळताच पुढील टप्प्याची कार्यवाही सुरू होईल. रेल्वे आणि महामार्ग हे प्रकल्प स्वतंत्र असले तरी दोघांकडूनही नियोजन सुरू आहे," अशी माहिती प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांनी दिली.