राज्यात ७५ हजार नोकर भरती होणार, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यानंतर विद्यापीठाच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकर भरती करण्यात येईल, अशी घोषणा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवाजी महाराजांचे भोसले घराणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी औरंगाबाद आहे, असा विलक्षण योगायोग आहे. विद्यापीठातील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या पुतळ्यातून येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहील.
तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी कुलगुरू प्रमोद येवले यांनी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही यावेळी दिली. याचवेळी प्रेक्षागृहात बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात लवकरच मंजूर पदांची भरती करण्यात येईल. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरीभरती करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री, भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांनीही उपस्थिती लावली होती.