Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक
आज महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज दोन्ही ठाकरे तब्बल १८ वर्षांनंतर एकत्र येणार असून हा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठी कार्यकर्ते वरळी डोममध्ये दाखल झाले आहेत. मात्र कार्यकर्त्यांची तुफान गर्दी येथे पाहायला मिळत असून वरळी डोम परिसर हा पूर्ण क्षमतेने भरला आहे.
कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी वरळीमध्ये उसळली असून अक्षरशः कार्यकर्त्यांकडून गेट फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही कार्यकर्त्यांमध्ये यावरून पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. आमच्याकडे पास असूनही आम्हाला आत सोडले जात नाही, यावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आला असतानासुद्धा त्यांना आतमध्ये प्रवेश दिला गेलेला नाही. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी वाढत असून पोलिसांना या कार्यकर्त्यांना रोखणे कठीण होत आहे. तर दुसरीकडे वरळी डोम हा पूर्ण क्षमतेने भरला असून आत आता अजिबात जागा नाही, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी तुफान गर्दी सध्या दादरच्या वरळीमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक मनसे, शिवसेनेच्या नेत्यांनाही प्रवेश करणे कठीण झाले असून वरळी डोमच्या गेटवर असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्येसुद्धा त्यामुळे तीव्र नाराजी दिसत आहे. अविनाश जाधव प्रकाश महाजन हे नेते या गर्दीमध्ये अडकले असून बऱ्याच मनसे, शिवसेनेच्या नेत्यांना आतमध्ये प्रवेश करणं कठिण झालं.
दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर गेटवरील कार्यकर्त्यांना आतमध्ये घेण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहण्यासारखा होता.