Mahesh Manjrekar : 'हे केवळ माझ्या मुलाखतीमुळे घडलं नाही..., ते एकत्र आले तर आनंदच'; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
मुंबईत आज मराठी विजय दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहेत. या ऐतिहासिक क्षणावर मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “केवळ माझ्या मुलाखतीमुळे हे घडतंय असं नाही, पण ‘मराठी’ हा मुद्दा घेऊन दोन भाऊ एकत्र येत आहेत ही फार मोठी आणि आनंददायी गोष्ट आहे,” असं मांजरेकर यांनी म्हटलं आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की, “बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन केली होती. आज त्यांचे दोन वारस उद्धव आणि राज ठाकरे, तब्बल वीस वर्षांच्या फुटीनंतर एका मंचावर एकत्र येत आहेत, हे संपूर्ण मराठी समाजासाठी अभिमानास्पद आहे.”
महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या निकटच्या संबंधांचाही उल्लेख केला. “राज ठाकरे हे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अनेकदा जवळून काम केलं आहे. कोणतीही गोष्ट तुटणं हे वाईट असतं. आज तीच गोष्ट पुन्हा जोडली जात आहे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे,” असं त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं.
दरम्यान, महेश मांजरेकर सध्या मनाली येथे एका आगामी चित्रपटाचं शूटिंग करत असल्यामुळे आजच्या ऐतिहासिक कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र, त्यांनी मनापासून आपला पाठिंबा आणि आनंद व्यक्त केला.