अंबरनाथमध्ये एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली, 2 जण गंभीर जखमी
राज्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या - नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. अंबरनाथमध्ये रविवारी (11 सप्टेंबर) रात्रभर तुफान पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळल्याची माहिती मिळत आहे. यात एकाच घरातील तीनजण जखमी झाले आहेत. तर दोघांना गंभीर इजा झाली आहे.
अंबरनाथ पूर्वेतील आंबेडकर नगर भागात ही घटना घडली.टेकडी परिसराची जमीन काहीशी खचली आणि टेकडीवर असलेल्या एका घराची भिंत खालच्या भागात राहणाऱ्या दिलीप सुरवाडे यांच्या घरावर कोसळली. दिलीप सुरवाडे हे कामावर जायला निघाले होते. तर त्यांची पत्नी आणि मुलगा झोपलेले होते. अचानक घराच्या पत्र्यावर भिंत कोसळल्याने पत्रे, अँगल आणि भिंतीचा ढिगारा या सर्वांच्या अंगावर पडला. त्यामुळे दिलीप सुरवाडे आणि त्यांची पत्नी बेबी सुरवाडे या दोघांना डोक्याला गंभीर इजा झाली. तर मुलगा मंगेश सुरवाडे यालापण इजा झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.