शिंदे गटातील सर्व उमेदवार पराभूत होतील, अजित पवारांचा दावा
चिंचवड आणि कसबा या विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे करतील, मग बाकीच्यांचा काय संबंध, अशी टीका विरोधी पक्षनेतेअजित पवार यांनी शिंदे गटावर केली आहे. ते चिंचवड येथे जाहीर सभेला संबोधित करत होते.
अजित पवार म्हणाले की, शिवसेना कोणी काढली हे सर्वांनाच माहिती आहे. जे गेले त्यांचा शिवसेना उभी करण्यात नखाचाही वाटा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिल्यामुळे ते निवडून आले. आम्हीही ते पाहिलेले आहे. पानटपरीवाले, वाहनं चालवणारी साधी-साधी माणसं खासदार, आमदार झाले. हे सगळं बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शक्य झाले.
पुढे ते म्हणाले, आता माझे वय झालेले आहे. इथून पुढे शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे हेच सांभालतील असे बाळासाहेब ठाकरेंना शिवाजी पार्कवरील सभेत सांगितले होते. मीही ती सभा टीव्हीवर पाहात होतो. या सभेला युवानेते म्हणून आदित्य ठाकरे त्या सभेत मंचावर आले होते. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेतले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते की युवानेते म्हणून आदित्य ठाकरे काम करतील, अशी आठवणही अजित पवार यांनी सांगितली. तसेच बाळासाहेबांनी सांगितलेले असताना सटर फटरवाले मध्येच काय करत आहेत. उद्या निवडणुका लागुद्या. त्यांची काय अवस्था होईल ते समजेल, असा टोलाअजित पवार यांनी शिंदे गटाला लगावला आहे..