Ajit Pawar On Badlapur Case : "...ही माझी ठाम भूमिका आहे"; बदलापूर घटनेवर अजित पवार यांचे संतापजनक ट्विट
बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. सफाई कामगाराने अत्याचार केल्याची संतपाजनक घटना समोर आली आहे. तर लैंगिक अत्याचाराच्या 4 दिवसानंतर प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला आदोलकांनी घेराव घातला आहे. तर बदलापूर रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. याच घटनेवर अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अजित पवार सोशल मीडियावर ट्विट करत म्हणाले की, बदलापूरमध्ये शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आणि अत्यंत संतापजनक आहे. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. या घटनेचा बारकाईने तपास केला जाईल. त्यासाठी आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. हा अक्षम्य गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांची जराही हयगय केली जाणार नाही. त्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची चौकशी जलद गतीने व्हावी, याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या लेकींना न्याय मिळालाच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संतापलेल्या पालकांनी आज सकाळपासून बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले. यादरम्यान, आंदोलकांकडून शाळेची तोडफोडही करण्यात आली आहे. तर रेल्वे स्थानकावर असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे.