“‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले, ठाकरेंचा शिंदे - भाजपावर जोरदार हल्लाबोल

“‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले, ठाकरेंचा शिंदे - भाजपावर जोरदार हल्लाबोल

सत्तांतरानंतर काल (6 नोव्हेंबरला) पहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सत्तांतरानंतर काल (6 नोव्हेंबरला) पहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आहे. यामध्ये उमेदवार ऋतुजा लटके प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये भाजपाने नोटाचा प्रचार करुन रडीचा डाव खेळल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. “अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून ऐक्य राखले. शिवसैनिकांबरोबर दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते मनापासून कामास लागले. मुस्लिम समाज असेल नाहीतर ख्रिस्ती बांधव, सगळेच मतदानास उतरले. मराठी जनांची एकजूट तर अभेद्यच राहिली. हृदयात धनुष्यबाण आणि हाती मशाल असे चित्र दिसले. दुसरीकडे भाजपा आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. त्यातूनच लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे, असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले. वास्तविक, कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही. ‘नोटा’ हा पूर्णपणे ऐच्छिक विषय आहे. तरीही ‘नोटा’चा प्रचार केला गेला. लोकांनी मतदान केंद्रांवर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे यासाठी काही ‘खोकी’ खर्चण्यात आली. त्यामुळे खोके सरकार आपल्या नामकरणास पुरेपूर जागले,” अशी टीका शिवसेनेचा अग्रलेख सामनातून करण्यात आला आहे.

तसेच “शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील. मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील व कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही मात्र कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा निकाल तेच सांगतोय. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यावर शिवसेना खचेल, हतबल होईल असे ज्यांना वाटत होते त्यांचे डोळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील ‘मशाली’च्या विजयी भडक्याने दिपले आहेत. ‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. तथापि, राज्याची जनता मात्र आज पुन्हा दिवाळी साजरी करीत आहे,” असे सामनातून म्हटले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या रणात उतरून ज्या शिवसैनिकांनी, मतदारांनी शिवसेनेस विजय मिळवून दिला त्यांचे आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत. आम्ही त्या शिवसेनाप्रेमींना साष्टांग दंडवत घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान राखल्याबद्दल लाख लाख धन्यवाद देत आहोत. आम्ही समोरून वार करणारे आहोत, पण शत्रूने वार वर्मी बसण्याआधीच रणातून पळ काढला. अशा पळपुट्यांनी विजयी मशालीवर उगाच गुळण्या टाकण्याचे प्रयत्न करू नयेत. विजयाची ही मशाल अशीच पेटत राहील! विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील! राजकीय चिता पेटवत राहील, असा इशारा सामनातून शिंदे - भाजपा सरकारला देण्यात आला आहे.

यासोबतच “अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जसा लागायचा तसाच लागला. भडकत्या मशालीवर विरोधकांनी गुळण्या टाकून विझविण्याचा प्रयत्न केला, पण मर्दांच्या हातातील मशालच ती. विझली नाहीच. उलट शिवसेनेचे तेज अधिक प्रकाशमान केले. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके ६६ हजार ५३० एवढी दणदणीत मते मिळवून विजयी झाल्या. देशातील पाच राज्यांतील सात ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या, पण सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते ते अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीकडे. कडवट, निष्ठावान आमदार रमेश लटके यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीच्या आधी मिंधे गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपाबरोबर सरकार स्थापन करून त्यांनी शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेतले. म्हणजे भाजपाने मिंधे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा निशाणा साधला,” असा हल्लाबोल ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

“‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले, ठाकरेंचा शिंदे - भाजपावर जोरदार हल्लाबोल
राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' आज महाराष्ट्रात दाखल होणार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com