Bacchu Kadu Protest : कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन; महाराष्ट्रभर पेटतोय प्रहारचा लढा
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संतप्त जनभावनांचा विस्फोट झाला आहे. कष्टकरी, शेतकरी, विधवा, दिव्यांग, कोकणातील कोडी व मेंढपाळांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. या लढ्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून अमरावतीपासून मुंबईपर्यंत आंदोलनांची लाट उसळली आहे. त्यांच्या पत्नींचा भावनिक संदेश, चांदूरबाजारातील जलसमाधी आंदोलन आणि मंत्रालयासमोरील तीव्र घोषणाबाजी या तिन्ही घटनांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं असून, प्रहार पक्षाने शासनाला थेट इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोझरी या पुण्यभूमीत बच्चू कडू यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्या पत्नींचा भावनिक संदेश हा शासनाला जागं करणारा ठरतो आहे. "लढवय्या कार्यकर्त्याला मरणाच्या तोंडात देऊ नका," असा त्यांचा साद घालणारा इशारा ठरला आहे. "ही मागणी फक्त आमच्या पक्षाची नाही, तर मातीतील कष्टकरी, विधवा, दिव्यांग, मेंढपाळ, कोकणातील कोडी आणि शेतकऱ्यांची आहे. या सर्वांसाठीच बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करत आहेत", असेही त्यांनी नमूद केले.
अमरावतीतील आंदोलन झालं तीव्र
प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत चांदूर बाजारनजिक विश्रोळी येथे जलसमाधी आंदोलन केले. पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या पाण्यात उतरून काही काळासाठी जलसमाधी घेतल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. तालुका अध्यक्ष मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. ठाणेदार उल्हास राठोड यांनी बंदोबस्त तैनात करत आंदोलन नियंत्रित केलं. प्रहार कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की, "जर शासनाने तात्काळ सकारात्मक पाऊल उचललं नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारलं जाईल."
मंत्रालयासमोर प्रहारचं आंदोलन
मुंबईतील मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी 'दिव्यांग पेन्शन 6 हजार रुपये करा', 'शेतकऱ्यांना हमीभाव द्या', अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं असून मंत्रालय परिसरात मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. सुरुवातीला मंत्रालयाच्या आत आंदोलन करण्याचा प्रहारचा मनसुबा होता. परंतु पोलिसांनी अडवल्याने आंदोलन मुख्य गेटबाहेर हलवण्यात आलं.
काय आहेत मागण्या?
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी पूर्णतः लागू कराव्यात.
दिव्यांग नागरिकांची पेन्शन 6 हजार रुपयांपर्यंत वाढवावी.
शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा.
कष्टकरी, मेंढपाळ, विधवा भगिनी, दिव्यांग, वंचित घटकांसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावेत.
प्रहार संघटनेचा इशारा
"जर शासनाने त्वरीत दखल घेतली नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल आणि याची जबाबदारी सरकारवरच राहील", असा इशारा समर्थकांनी दिला.